गणेश चतुर्थी हा आपल्या संस्कृतीतील एक महत्त्वपूर्ण सण आहे. यावेळी श्री गणेशाला घरी आणण्याचा शुभ मुहूर्त आणि त्याच्या पूजेसाठी योग्य ती मूर्ती निवडणे हे अत्यंत आवश्यक मानले जाते. शास्त्रानुसार कोणतेही शुभकार्य शुभमुहूर्तावर केल्यास ते कार्य आयुष्यभर लाभदायक ठरते. श्री गणपतीला विघ्नहर्ता मानले जाते आणि शुभ मुहूर्तावर त्याला घरी आणल्यास वर्षभर येणाऱ्या विघ्नांचा नाश होतो.
श्री गणरायाचे आगमनाचे शुभ मुहूर्त:
श्री गणेशाचे आगमनासाठी योग्य मुहूर्त हा खूप महत्त्वाचा आहे. यावर्षी, गुरुवार दिनांक ५ सप्टेंबर २०२४ रोजी भाद्रपद शुक्ल द्वितीया दिवशी बलवान हस्त नक्षत्र आहे. या शुभ मुहूर्तावर श्री गणेशाची मूर्ती घरी आणण्याची विनंती आहे.
मुहूर्त:
1. सकाळी ११:१९ ते १:३३ स्थिर वृश्चिक लग्न
2. दुपारी १२:३० ते १:३० लाभ
3. संध्याकाळी ५:२९ ते ७:०७ स्थिर कुंभ लग्न
4. रात्री ६:३० ते ८:०० लाभ
श्री गणेशमूर्तीची निवड:
गणेशमूर्तीची निवड करताना, ती शाडू मातीची आणि ९ ते ११ इंच उंच असावी. अथर्वशीर्षांत वर्णिलेल्या गणेशासारखी मूर्ती असावी:
– एकदन्तम् (एक दात असलेली)
– चतुर्हस्तम् (चार हात असलेली)
– पाशमंकुश धारिणम् (पाश व अंकुश धारण करणारी)
– लंबोदर (मोठ्या पोटाची)
– मूषकध्वजम् (मूषकावर स्वार असणारी)
गणेशमूर्ती ही पाटावर बसलेली, हातात पाश व अंकुश धारण केलेली, आणि नैसर्गिक रंगांनी रंगवलेली असावी.
श्री गणेशाची मूर्ती घरी आणताना पाळावयाचे नियम:
घरच्या प्रमुख व्यक्तीने शक्यतो चप्पल न घालता गणेशमूर्ती आणावी. मूर्ती घरी आणल्यानंतर दरवाजात थांबून घरच्या लक्ष्मीने अखंड पोळी ओवाळावी व पतीच्या, मुलांच्या कपाळाला गुलाल लावावा. त्यानंतर टाळ्यांच्या कडकडाटात श्री गणेशाचे स्वागत करून मूर्तीची स्थापना करावी.
श्री गणेशाची स्थापना शुभ मुहूर्त:
त्याच बोरोबर दिनांक ७ सप्टेंबर रोजी सकाळी लवकर श्री गणरायाची मूर्ती घरी येऊन येऊ शकतात. शनिवार, दिनांक ७ सप्टेंबर २०२४ रोजी श्री गणेश चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तानंतर दिवसभरात कधीही श्री गणेशाची स्थापना करता येईल.
या गणेश चतुर्थीला श्री गणरायाचे योग्य मुहूर्तावर स्वागत करून त्याच्या आशीर्वादाने घरातील सर्व विघ्नांचा नाश होवो आणि आपले जीवन सुखमय होवो, हीच सदिच्छा!
श्री गणेशाय नमः!




